मऊ : उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅन व रेल्वेची धडक होऊन सहा शाळकरी बालके ठार, तर नऊ जखमी झाली. ठार झालेल्या मुलांचे वय अवघे ४ ते ५ वर्षांचे होते. हा अपघात वाहनचालकाच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचे पोलिसांनी सांगितले. महासो या गावाजवळील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून ही स्कूल व्हॅन जात असताना आजमगडहून वाराणसीला जाणारी तमसा पॅसेंजर गाडी व्हॅनवर धडकली. या धडकेने व्हॅनच्या चिंधड्या उडाल्या. या भीषण अपघातात पाच मुले जागीच ठार झाली, तर एकाचे रुग्णालयात निधन झाले. ही सर्व मुले हाजीपूरच्या डीडी कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थी होते. ठार झालेल्या मुलांपैकी चौघांची ओळख पटली असून त्यांची नावे शिवम्, सुंदरम् व आयुष, कृष्णा अशी आहेत. दोन मुलांची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्हॅनमध्ये १५ मुले होती, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
स्कूल व्हॅनवर रेल्वे धडकून सहा ठार
By admin | Updated: December 5, 2014 01:59 IST