रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातून सायमन मरांडी यांची हकालपट्टी केली. सोरेन यांनी गेल्या अडीच महिन्यात दोन मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून राज्यपाल डॉ. सैयद अहमद यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री सायमन मरांडी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्याचे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले. यापूर्वी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्री चंद्रशेखर दुबे ऊर्फ ददई दुबे यांना १९ फेब्रुवारीला डच्चू देण्यात आला होता. सायमन मरांडी झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. मुख्यमंत्री सोरेन यांनी सायमन मरांडी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. सायमन मरांडी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.दरम्यान, चंद्रशेखर दुबे यांनी हेमंत सोरेन यांना आतापर्यंतचा सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री म्हटले होते. शिवाय त्यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार दिल्याने सोरेन यांनी काँग्रेसच्या सहमतीनंतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. (वृत्तसंस्था)---दुसरी विकेटसायमन मरांडी हे सोरेन मंत्रिमंडळातून बडतर्फ झालेले दुसरे मंत्री आहेत. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सोरेन यांनी चंद्रशेखर दुबे यांची हकालपट्टी केली होती. दुबे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करीत त्यांना भ्रष्ट म्हटले होते. मरांडी यांना पक्षविरोधी कारवायांमुळे बडतर्फ केल्याचे सांगण्यात येत आहे.
सायमन मरांडी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
By admin | Updated: May 7, 2014 02:37 IST