बंगळुरू : ‘ये हाथ हम को दे दे ठाकूर’, ‘ये हाथ नहीं फांसी का फंदा है’ यासारख्या डायलॉगमधून अजरामर झालेला शोले चित्रपट कुणाला माहीत नाही? जुन्या आणि नव्या पिढीवरही ‘शोले’चे गारूड कायम आहे. कर्नाटकातील बंगळुरजवळच्या ज्या रामनगर गावात या चित्रपटाचे शूटिंग झाले होते त्या भागात आता सरकारचा पर्यटन विभाग ‘शोले द थ्री डी व्हर्च्युअल व्हिलेज’ उभारत आहे. ४२ हजार वर्ग फुटावर उभ्या राहणाऱ्या या व्हिलेजसाठी ७.५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सरकारी आणि खासगी भागीदारीतून होणाऱ्या या योजनेला अंतिम रूप दिले जात आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे मार्केट आणि अन्य काही योजनांचाही विचार केला जात आहे. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ठिकाण बंगळुरूच्या जवळ असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे सोपे जाणार आहे. प्रस्तावित व्हिलेजमध्ये चित्रपटांचे दृश्य जिवंत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. धर्मेंद्रने आत्महत्येचा प्रयत्न केलेली पाण्याची टाकी, चित्रपटातील टांगा या भागात दिसणार आहे. एकूणच शोलेच्या आठवणींना या व्हिलेजमध्ये नव्याने उजाळा मिळणार आहे.
रामनगरच्या डोंगरी भागात होणार ‘शोले व्हिलेज’
By admin | Updated: April 8, 2017 00:33 IST