ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केले जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी येथे झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडे दुर्लक्षच केले आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेने मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे.
शनिवारी महालक्ष्मीतील रेसकोर्स मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. सभेच्या शेवटी मोदींनी मैदानात कचरा फेकू नका, मैदानात टाकलेला कचरा उचला, भारत स्वच्छ ठेवा असे आवाहन केले होते. मात्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासला. सभेसाठी आलेल्यांनी मैदानात पाण्याचे ग्लास, झेंडे, टोप्या, फलक टाकून दिले होते. सभा संपल्यावरही हा कचरा असाच पडून होता. रविवारी सकाळी रेसकोर्सवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी हा प्रकार बघून नाराजी व्यक्त केली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे स्थानिक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते रेसकोर्स मैदानात दाखल झाले व त्यांनी मैदानात स्वच्छता मोहीम राबवत भाजपवर कुरघोडी केली.