ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - शीला दीक्षित यांनी केरळच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आज राजीनामा सुपूर्द केला. दीक्षित यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी केरळच्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारला होता. आपण हा निर्णय कोणत्याही दबावामुळे नव्हे, तर आपल्या मनाने घेतल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदावरून हटवून इतरत्र बदली केल्यास त्या राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होती. त्यांनी काल (सोमवार) दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. अखेर आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी रविवारीच राजीनामा दिला होता. याच पार्श्वभूमीवर दीक्षित काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते.