ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींसाठी भेट म्हणून एक साडी पाठवली आहे. खुद्द नरेंद्र मोदी यांनी याबद्दल ट्विट केले असून शरीफ यांचे आभारही मानले आहेत.
'नवाझ शरीफ यांनी माझ्या आईसाठी भेट म्हणून एक सुंदर साडी पाठवली आहे. या भेटीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. लवकरच ही साडी मी माझ्या आईकडे पाठवणार आहे,' असे ट्विट मोदींनी केले आहे.
यापूर्वी नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांच्या आईसाठी भेट म्हणून एक सुंदर शाल पाठवली होती. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतात उपस्थित राहिलेल्या शरीफ यांच्याकडे मोदींनी ती शाल भेट म्हमून दिली होती. याबद्दल शरीफ यांच्या कन्येने ट्विटरवरून मोदींचे आभार मानले होते.