ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २२ - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी यांनी काँग्रेसमध्ये यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. 'भाजपला मिळालेल्या यशानंतर देशातील काँग्रेससारखी विचारधारा असलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी एका मुलाखातीमध्ये हे आवाहन केले आहे. देशात प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू व मुस्लिम मतांचे विभाजन झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच उघडपणे भाजपसाठी प्रचार केला. मात्र आता या विरोधात लढा देण्यासाठी काँग्रेससोडून गेलेल्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतून एकत्रित लढा द्यावा असे दिग्विजय सिंह स्पष्ट करतात. राहुल गांधींची टीम आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये दुरावा नव्हता असे सांगत दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राजकीय कौशल्य दाखवत टू जी घोटाळा व कोळसा घोटाळाप्रकरणात झालेल्या आरोपांचे खंडन करायला पाहिजे होते असे मतही त्यांनी मांडले.