शिवराज यादव / नोएडातुमचा टीव्ही, फ्रिज किंवा मोबाइल बिघडला असेल आणि तुम्ही जर ग्रामीण भागात राहात असाल तर तुम्हाला शहरी भागात येण्याची गरज नाही. कारण सॅमसंगने त्यांच्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी खास सर्व्हिस व्हॅन सुरू केली आहे. देशभरातील ६ हजार तालुक्यांसाठी ५६५ सर्व्हिस वॅन्स उपलब्ध असणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना घरबसल्या सेवा मिळेल. ही व्हॅन घरी येऊन बिघाड दुरुस्त करणार आहे. व्हॅनमध्ये स्वत: इंजिनीअर असेल आणि दुरुस्ती करण्यासाठी लागणारे सर्व सामान सोबत असेल. याशिवाय २५० सर्व्हिस पॉर्इंट्स असणार आहेत जिथे स्थानिक इंजिनीअर्सना नियुक्त करण्यात येणार आहे. या सर्व्हिस व्हॅनमध्ये विभाजन करण्यात आले असून, मोबाइलसाठी स्वतंत्र व्हॅन असणार आहे. ग्रामीण आणि शहरातील अंतर कमी व्हावे, हा आमचा उद्देश आहे. फक्त ‘मेड इन इंडिया’ नाही, तर ‘मेड फॉर इंडिया’वरही आम्ही लक्ष केंद्रित करत असल्याचे सॅमसंगच्या दक्षिण-पूर्व आशियातील अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी एच.सी. हाँग यांनी सांगितले. आज सर्व प्रकारचे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहोचत आहे मात्र ते दुरुस्त करण्याची सोय नाही. सॅमसंगमुळे ही सुविधा उपलब्ध होत असून, यामुळे डिजिटल इंडियाला मदत मिळेल, असे केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले.
मोबाइल दुरुस्तीसाठी येणार सर्व्हिस व्हॅन
By admin | Updated: October 15, 2016 01:26 IST