ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १७ - जम्मू-काश्मिरमधील पूरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय जवानांनी प्राणांची तमा न बाळगता मदतकार्यात झोकून दिलेले असतानाच काही जण मात्र त्यात अडथळे आणत आहेत. जम्मू-काश्मिरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिक यात आघाडीवर आहे. लष्कराचे जवान पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी एका नावेतून साधनसामग्री घेऊन जात असतानाच मलिक व त्याच्या साथीदारांनी ती नाव हिसकावून घेतली. हा प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या असणा-या मलिकने त्याच्या साथीदारांसह १३ सप्टेंबर रोजी लष्कराच्या मदतकार्यात अडथळा आणला, त्यांची बोट हिसकावली. ही घटना कॅमे-यात कैद झाली असून त्यात मलिक व त्याचे साथीदार सामान बळकावताना स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे लोकांना मदत करण्याचा दावा करणा-या मलिकचे पितळ उघडे पडले आहे. मलिकच्या या कृत्यामुळे नागरिक अतिशय संतापले असून त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.
'आम्ही लाल चौक भागात चार नावांमधून पूरग्रस्तांसाठी काही सामान घेऊन गेलो होतो. यासिन मलिक व त्याचे समर्थक तेथे आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी आमच्या बोटी ताब्याता घेतल्या, त्यात त्यांचे सामान टाकले आणि ते निघून गेले. जे लोक काश्मिरच्या भल्याबाबत बोलत असतात, त्यांनीच हे संतापजनक कृत्य केले' असे बचावपथकातील एका जवानाने सांगितले.
यासिक मलिक यापूर्वीही अनेकवेळा वादात सापडला आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदसोबत मलिकचा फोटो प्रसिद्ध झाल्याने मोठा गहजब माजला होता. त्यातच आता मलिकने मदतकार्यात झोकून देणा-या लष्कराचे श्रेयही लाटल्याने सर्व स्तरांतून त्याच्यावर टीका होत आहे.
महापुराची भीषण आपत्ती ओढवलेल्या जम्मू-काश्मिरातील लाखो पूरग्रस्तांना वाचविण्यात आले आहे. मात्र अद्यापही हजारो लोक पुरात अडकले असून त्यांच्या बचाव व मदतीचे काम सुरू आह़े