नवी दिल्ली : विशाखापट्टणमच्या किना-यावर बुडालेल्या युद्धनौकेतील एका अधिकाऱ्यासह चार बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून त्यांचा अद्यापि काही तपास लागलेला नाही. टारपिडो रिकव्हरी या युद्धनौकेच्या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या युद्धनौकेतील एका जवानाचा मृत्यू झाला तर २३ जणांना वाचविण्यात यश मिळाले होते.नौदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांच्या सेशल्सच्या दौऱ्यावर गेलेले नौसेना प्रमुख अॅडमिरल आर.के. धोवन विशाखापट्टणमला परत येत आहेत. त्यांचा हा दौरा ९ नोव्हेंबरपर्यंत होता. नौसेनेचे प्रवक्ते डी.के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मध्यरात्री नऊ जहाजे व बोईंग पी ८१, चेतक हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणा प्रयत्नरत होती. ही युद्धनौका बुडण्यामागे, इंजिन कक्ष अथवा संचालन कक्षात पाणी शिरले असल्याचे कारण असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अपघात व मृत्यूचा गुन्हा दाखलदरम्यान मलकापुरम पोलिसांनी पूर्व कमानने दिलेल्या अहवालाच्या आधारावर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस उपायुक्त जी. रामगोपाल नायक यांनी सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बुडालेल्या नौकेतील कर्मचा-याचा शोध
By admin | Updated: November 8, 2014 02:22 IST