भोकर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
आठ दिवसात चार जनावरांना ढकलले मृत्यूच्या जाळ्यात
भोकर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
आठ दिवसात चार जनावरांना ढकलले मृत्यूच्या जाळ्यातभोकर : मागील आठ दिवसापासून भोकर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार जनावरांवर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकर्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोकर तालकुयातील सायाळ येथील शेतकरी जितेंद्र माधवराव सावंत यांची गाय शेतात बांधली होती. २८ जानेवारी रोजी या गायीवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. या बाबतची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा केला असून पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार यांनी शवविच्छेदन केले. या घटनेच्या अगोदर बिबट्याने पार्डी येथील शेतकरी संभाजी हौसरे यांच्या वगारीवर हल्ला करुन मारले. याचबरोबर भोसी येथील शेतकरी गजराम खंडके, चिंचाळा येथील कदम यांच्या जनावरांचा फडशा पाडला. मागील आठ दिवसात बिबट्याने चार जनावरांचा फडशा पाडल्यामुळे शेतकर्यांत भिती निर्माण झाली आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)