ग्रामसभेतून सरपंच गेल्या निघून
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
कार्हाटी ग्रामपंचायत : तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून तंटा
ग्रामसभेतून सरपंच गेल्या निघून
कार्हाटी ग्रामपंचायत : तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून तंटाकार्हाटी : कार्हाटी येथे पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून झालेल्या आक्रमक चर्चेनंतर सरपंचांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला. गावासंबंधीच्या योजना, विविध निर्णय यांबाबत ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकताच सरपंच ग्रामसभेतून निघून गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.ग्रामसभेत १५० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. मागील वर्षापासून तंटामुक्तीच्या अध्यक्षाची निवड केली नाही. ती निवड आजच करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावातील बी. के. जाधव या व्यक्तीचे नाव सुचवले. या नावाला सर्व ग्रामस्थांनी सहमती दिली. यावर ग्रामस्थांची मागणी मंजूर करणे गरजेचे असतानाच सरपंच सुरेखा खंडाळे ग्रामसभेतून निघून गेल्या. ग्रामसभेला सरपंचच नसल्याने ग्रामसेविकांनी तंटामुक्तीची निवड पुढे ढकलल्याचे सांगितले. यावर जमलेल्या ग्रामस्थांनी निवड आज करा, असा आग्रह धरला. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हजर असताना एक व्यक्ती नाही म्हणून काय झाले? उपसरपंच आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्याची मागणी केली. यावर ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यांनीही सरपंच नसतील, तर पुढील ग्रामसभेला हा विषय घेण्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामसभेला ग्रामस्थांनाच किंमत नसल्याने ग्रामसभेला यायचे कशासाठी, अशी नाराजी व्यक्त करून ग्रामस्थ निघून गेले.