नवी दिल्ली : देशभरातील तालुका न्यायालयांपासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत शनिवारी एकाच दिवशी आ२योजित केलेल्या लोक न्यायालयांमध्ये तब्बल ५६ हजार प्रलंबित दावे निकाली निघाले व बँका आणि वित्तीय संस्थांच्या २६५ कोटी रुपयांच्या थकीत येण्यांच्या वसुलीचे आदेश तडजोडीने झाले.देशपातळीवरील या लोक न्यायालयांचे आयोजन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (नाल्सा) केले होते. त्यात प्रामुख्याने बरेच वर्षे नियमित न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले वसुलीचे दावे व चेक न वटल्याचे खटले उभयपक्षी संमतीने सुनावणीसाठी अथवा तडजोडीने समेटासाठी घेण्यात आले.प्रत्येक महिन्यात एका शनिवारी संपूर्ण देशभर अशा प्रकारे एकाच दिवशी लोक न्यायालये भरवून त्यात ठरावीक विषयांसंबंधीची प्रलंबित प्रकरणे हातावेगळी करण्याचे ‘नाल्सा’ने ठरविले आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षातील देश पातळीवरील पहिल्या लोक न्यायालयांचे आयोजन शनिवारी केले गेले. आसाम व उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता त्यास देशभर भरघोस प्रतिसाद मिळाला, असे ‘नाल्सा’ने कळविले. देशातील न्यायालयांमध्ये तीन कोटींहून अधिक दावे/खटले प्रलंबित आहेत़ सध्याची यंत्रणा लक्षात घेता येत्या १५ वर्षांतही त्यांचा निपटारा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाद व तंटे मिटविण्याचा पर्यायी मार्ग म्हणून ‘नाल्सा’ लोक न्यायालयांना प्रोत्साहन देत आहे. यात वाद न्यायालयात येण्यापूर्वी ही सोडवण्याची सोय आहे. त्यामुळे एकीकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होणे व नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांना आळा घालणे, असे दुहेरी उद्दिष्ट साध्य होते. शिवाय लोक न्यायालयांमध्ये दावे शक्यतो तडजोडीने सुटत असल्याने त्याविरुद्ध अपिलेही होत नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एकाच दिवशी ५६ हजार दावे निकाली
By admin | Updated: February 16, 2015 03:46 IST