वस्त्रांतरगृह पाडण्यास सर्वपक्षीय विरोध गटनेत्यांची भूमिका : महंतांची भूमिका अव्यवहार्य; सिंहस्थ कामांना द्या प्राधान्य
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडाजवळील वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी घेतलेल्या हटवादी व अव्यवहार्य भूमिकेला महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन सिंहस्थात इमारतीचा कोणताही अडथळा आला नाही आणि आत्ताच इमारतीचा प्रश्न का उद्भवला, असा सवाल करत आता उद्ध्वस्त नव्हे तर निर्माणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांना पूर्णत्व बहाल करण्याची ही वेळ असल्याचा टोलाही गटनेत्यांनी लगावला आहे.
वस्त्रांतरगृह पाडण्यास सर्वपक्षीय विरोध गटनेत्यांची भूमिका : महंतांची भूमिका अव्यवहार्य; सिंहस्थ कामांना द्या प्राधान्य
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडाजवळील वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी घेतलेल्या हटवादी व अव्यवहार्य भूमिकेला महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन सिंहस्थात इमारतीचा कोणताही अडथळा आला नाही आणि आत्ताच इमारतीचा प्रश्न का उद्भवला, असा सवाल करत आता उद्ध्वस्त नव्हे तर निर्माणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांना पूर्णत्व बहाल करण्याची ही वेळ असल्याचा टोलाही गटनेत्यांनी लगावला आहे. गुरुवारी पालकमंत्र्यांनी महंत ग्यानदास यांची भेट घेतली असता महंतांनी रामकुंडावरील वस्त्रांतरगृहाची इमारत अर्धी का होईना पाडून टाकण्याची अजब मागणी केली होती. इमारत पाडून टाकण्यास नाशिककरांनी यापूर्वीही विरोध केला असताना, पुन्हा एकदा महंतांनी इमारतीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. साधू-महंतांनी नवनिर्माण करण्याचे समर्थन करायचे की उद्ध्वस्त करण्याची भूमिका घ्यायची, अशा टिपण्याही केल्या जात आहेत. महंतांनी केलेल्या या मागणीला महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गटनेते उत्तमराव कांबळे यांनी सांगितले, आतापर्यंत दोन सिंहस्थ पार पडले तेव्हा इमारतीचा अडथळा आला नाही. वस्त्रांतरगृहाचा महिला भगिनींना उपयोगच होत आहे. तो स्त्रियांच्या अब्रूचा आणि इभ्रतीचा प्रश्न आहे. इमारत पाडण्यास आमचा सक्त विरोध आहे. शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले, सिंहस्थ तोंडावर येऊन ठेपला असताना इमारत पाडण्याचा मुद्दा उपस्थित करणेच चुकीचे आहे. त्यातून पैशांचा आणि वेळेचाही अपव्यय होणार आहे. सिंहस्थाचा पर्वकाळ संपल्यानंतर महिला भगिनींसाठी वस्त्रांतरगृहाची गरज भासणारच आहे. कुणीतरी येऊन काहीही मागणी करत असेल तर ते चालणार नाही. या शहराचेही काही नियम आहेत. वस्त्रांतरगृहाचा योग्य उपयोग होत नसेल तर त्याविरोधात कारवाई करण्यास आमची सहमती आहे; परंतु इमारतच पाडून टाकण्याची भूमिका अव्यवहार्य आहे. कुणाचे वाद असतील तर त्यांनी ते आपापसात सोडवावे. विनाकारण प्रशासनाला आणि शहरालाही वेठीस धरू नये. मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनीही इमारत पाडून काहीही साध्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. कुंभमेळा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, परंतु अशा मागण्या करून त्याला गालबोट लागता कामा नये. काही वाद असतील तर चर्चेतून मार्ग काढता येईल. राष्ट्रवादीच्या गटनेत्या व विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक यांनीही इमारत पाडण्याची ही वेळ नव्हे, असे सांगत पर्याय उपलब्ध करून दिला जात असेल तर खुशाल पाडा इमारत, अशी भूमिका स्पष्ट केली. गोदाघाटावर महिलांना वस्त्र बदलण्यासाठी पुरेशी जागा नाही. आमच्या भगिनी उघड्यावरच वस्त्र बदलतात. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी आहे ते पाडण्याची होणारी भाषा चुकीची आहे. भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी सावध भूमिका घेत पुरोहित संघ व साधू-महंत यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री दोहोंशी समन्वय साधून त्यातून निश्चितच तोडगा काढतील. परंतु इमारत पाडावी असे मला वाटत नाही. माकपचे गटनेते ॲड. तानाजी जायभावे यांनी तर जनतेच्या पैशातून उभी असलेली इमारत पाडण्यास तीव्र विरोध दर्शवित प्रसंगी आंदोलनही उभे करण्याचा पवित्रा घेतला. महंतांच्या खांद्यावर कुणी बंदूक ठेवून आपला उद्देश साध्य करून घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आता अर्धी का होईना इमारत पाडण्याची होणारी भाषा पाहता त्यापाठीमागे काहीतरी राजकारण दडलेले दिसून येते. अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनीही इमारत पाडण्याची ही वेळ नसून सिंहस्थ कामांना प्राधान्य देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.