वाराणसी : कन्या भ्रूणहत्या संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील जयापूर हे गाव दत्तक घेत एक आदर्श घालून दिला. आपले प्रश्न सोडविण्यासाठी सरकारवर अवलंबून राहणे सोडा, असे भावनिक आवाहनही त्यांनी गावकऱ्यांना केले. कन्या भ्रूणहत्येमुळे सामाजिक घडी विस्कटण्याचा धोका असून या गंभीर प्रश्नाशी संबंधित अनेक मुद्यांना त्यांनी हात घातला. गेल्या ६० वर्षांपासून या गावाची स्थिती न सुधारण्यामागे दिल्ली आणि लखनौतील राजकारण आहे. बड्या लोकांनी बड्या बाता ठोकल्या; पण त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. मी एक छोटा माणूस असून छोट्या गोष्टींमधून बदल घडवून आणणार आहे. महिलांची भरगच्च गर्दी असलेल्या या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, मुलींकडे बोजा म्हणून पाहणाऱ्या लोकांनी स्त्रीविना जग राहिल्यास मनुष्य कसा जगेल याचा विचार करावा. एक हजार मुलांपैकी केवळ ८०० मुली जन्मतात. तुम्ही मातेच्या गर्भातच मुलीला ठार मारत असाल तर भ्रूणहत्या कोण रोखणार? हे काम सरकार करेल काय? त्यामुळे प्रत्येक बाबीसाठी सरकारवर अवलंबून राहणे सोडा, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)
कळमन्यातील दरोड्याचा छडा
By admin | Updated: November 8, 2014 02:51 IST