पुन्हा सुधारित : राजीव महर्षी नवे केंद्रीय गृहसचिव नियुक्त
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
गोयल यांचा कार्यकाळ समाप्त : आयटीपीओचे सीएमडी पद बहाल
पुन्हा सुधारित : राजीव महर्षी नवे केंद्रीय गृहसचिव नियुक्त
गोयल यांचा कार्यकाळ समाप्त : आयटीपीओचे सीएमडी पद बहाल(यात गोयल यांच्या नियुक्तीसोबत हरीश गुप्तांच्या बातमीतील काही भाग जोडला आहे.)हरीश गुप्ता : नवी दिल्लीअचानक घडलेल्या एका आश्चर्यजनक घडामोडीत सोमवारी सेवानिवृत्त होणार असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव महर्षी यांची केंद्रीय गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सात महिन्यांपूर्वी गृह सचिवपदाचा कार्यभार सांभाळणारे एल. सी. गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती मागितल्यामुळे त्यांचा कार्यकाळ अचानक समाप्त करीत केंद्र सरकारने त्यांच्याजागी महर्षी यांची नियुक्ती केली. गोयल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपायला अद्याप १७ महिने बाकी होते. त्यांना गृह सचिवपदावरून हटविण्यात आल्यानंतर भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेच्या (आयटीपीओ) चेअरमन आणि प्रबंध संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यामुळे महर्षी सोमवारी सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच सरकारने त्यांना गृह सचिवपदी नियुक्त करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोबतच गोयल यांचा स्वेच्छानिवृत्तीची विनंती करणारा अर्जही मंजूर करून त्यांना आयटीपीओच्या सीएमडीपदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली. कार्यकाळ संपण्याच्या आधीच पदावरून हटविण्यात आलेले गोयल हे तिसरे नोकरशहा आहेत. याआधीचे गृह सचिव अनिल गोस्वामी आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना कार्यकाळ संपण्याच्या आधीच घरी पाठविण्यात आले होते.१९७८ च्या तुकडीतील राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी महर्षी यांच्या तत्काळ प्रभावाने दोन वर्षांसाठी करण्यात आलेल्या या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. महर्षी हे सध्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाज विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान सेवानिवृत्ती घेण्याचा आपला निर्णय व्यक्तिगत आहे आणि सरकारवर आपली कसलीही नाराजी नाही. व्यक्तिगत कारणांमुळे मी पदावर कायम राहू इच्छित नाही. हा माझा स्वत:चा निर्णय आहे. यामागे दुसरे कोणतेही कारण नाही, असे गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. सन टीव्हीला सुरक्षा मंजुरी देण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवरून गोयल यांचा काही मंत्रालयांसोबत वाद सुरू होता. तसेच नागा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यावेळी पीएमओने गोयल यांना दुर्लक्षित केले होते. त्याचाही राग गोयल यांच्या मनात खदखदत होता, असे सूत्रांनी सांगितले.गोयल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. दोघेही केरळ कॅडरमधील आयएएस अधिकारी आहे. गोयल हे गृह सचिव असले तरी त्यांना बाजूला सारूनच अनेक निर्णय घेण्यात येत असल्याने त्यांनी आधी राजीनाम्याचा प्रस्ताव दिलेला होता. परंतु गृहमंत्री राजनाथसिंग यांनी त्यांची समजूत घातली आणि हा मुद्दा मिटला. नोकरशाहीमध्ये महर्षी यांची नियुक्ती वित्तमंत्री अरुण जेटली यांचा व्यक्तिगत विजय मानला जात आहे. जेटली यांनीच महर्षी यांना राजस्थानमधून वित्त मंत्रालयात आणले होते.