डेअरी फार्म सुरू करण्याचा संकल्प
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
पशुसंवर्धन समितीत निर्णय : दूध उत्पादनाला चालना
डेअरी फार्म सुरू करण्याचा संकल्प
पशुसंवर्धन समितीत निर्णय : दूध उत्पादनाला चालना नागपूर : जिल्ह्यातील दूध उत्पादनाला चालना मिळावी, सोबतच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या सदस्यांनी डेअरी फार्म सुरू करण्याचा संकल्प बुधवारी समितीच्या बैठकीत केला आहे. सभापती आशा गायकवाड यांनी ही माहिती दिली.आत्महत्यांना आळा बसण्यासाठी शेतीला जोडधंद्याची गरज आहे. परंतु ग्रामीण भागात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समितीचे सभापती व सर्व सदस्य डेअरी फार्म सुरू करणार आहेत. इतरांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी होते. दूध उत्पादनासाठी चांगले वातावरण असूनही लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे, यावर चर्चा करण्यात आली.जनावरांना उपचार मिळावे, यासाठी सालई गोधनी, बेला, सिर्सी व आपतूर येथे पशु वैद्यकीय रुग्णालयाचे बांधकाम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यात ९४ दवाखाने आहेत. यातील सहा ठिकाणच्या दवाखान्यांना इमारती नाहीत. काही ठिकाणी शासनाने मंजुरी दिली आहे परंतु जागा उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. बैठकीला गायकवाड यांच्यासह प्रणिता कडू, सुनील जामगडे, गोपाल खंडाते, अंजिरा उईके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बाबा वाणी, अनिल ठाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)चौकट...१.२३ कोटीचा प्रस्तावपशुसंवर्धन विभागाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पासाठी १.२३ कोटीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ९६ लाखांची तरतूद करण्यात आली होती.