ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २० - लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दारूण पराभव झालेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी पराभवाचे खापर पार्टीचा जाहिरात विभाग सांभाळणा-या जपानी कंपनीवर फोडले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार डेंन्तसू या जपानी कंपनीला या दोषापासून पळता येणार नाही असे स्पष्ट करताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की या कंपनीने पैसे तर जास्त आकारलेच शिवाय विविध प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरातीचे दरही जास्त मान्य केले. डेंन्तसूला काँग्रेसने ६०० कोटी रुपयांचे मानधन देऊन काम दिल्याची चर्चा आहे. यापूर्वी भारतीय जनता पार्टी जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना भुलवत असल्याची टीका काँग्रेसने केली होती. भाजपाचा जाहिरात विभाग पियुष पांडे, प्रसून जोशी व सॅम बलसारा यांनी सांभाळला होता. त्यांना टक्कर देताना काँग्रेसचे नेते राहूल गांधी सर्वसामान्य माणसांना सशक्त करतील असे जनतेच्या मनात बिंबवण्याची जबाबदारी डेंन्तसूवर होती.
परंतु डेन्तसूच्या प्रवक्त्यांनी या आरोपांचा विरोध केला आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहार हा पारदर्शक होता आणि जास्त पैसे आकारण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याखेरीज जाहिराती वितरीत करण्यासाठी आणखी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती आणि अत्यंत पारदर्शक रीतीने सगळे दर आधीच निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले. याच मुद्यावरून डेन्तसूच्या रोहीत ओहरी यांचा काँग्रेस नेते अजय माकन यांच्याशी कडाक्याचा वाद झाला होता.
याबाबत माकन यांनी प्रतिक्रिया दिली नसल्याचे तसेच, डेन्तसूनेही ग्राहकांबाबत प्रसारमाध्यमांशी काहीही न बोलण्याची अट असल्याचे कळवल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.