ऑनलाइन लोकमत
मैनपुरी, दि. 7 - महिलेच्या संमतीनेच बलात्कार होतो, अशी मुक्ताफळे समाजवादी पक्षाचे नेते तोताराम यादव यांनी उधळली आहेत. मैनपुरी येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. यादव यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखता येऊ शकतात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, 'महिलांवर कधीही बलात्कार होत नाही, जे होतं ते पुरूष व (त्या) महिलेच्या सहमतीनेच होतं. बलात्काराचे दोन प्रकार असतात, एक जबरदस्तीचा अत्याचार आणि दुसरा म्हणजे दोघांच्याही सहमतीने झालेला,' असेही ते म्हणाले.
' बलात्कार झाल्यानंतर लोक सरकारला दोष देतात, कायदा-व सुव्यवस्था नसल्याने अशा घटना घडतात, असं लोकांचं म्हणणं असतं. पण जर कोणी स्वत:च्या मर्जीनेच बलात्कार करून घेत असेल तर त्याला सरकार तरी काय करणार? हे सगळं त्यांच्या मर्जीनेचे होतं असतं, फक्त अशा घटना समोर आल्या की त्याला बलात्काराचे नाव दिलं जातं, असे सांगत उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटना होतच नाहीत,' असा अजब दावाही त्यांनी केला.
यापूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनीही बलात्कारासंदर्भात असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. ' ते मुलगे आहेत, त्यांच्याकडून अशा (बलात्काराच्या) चुका होत असतात . त्यासाठी त्यांना काय फाशी द्य़ायची का ?' असा सवालही त्यांनी विचारला होता.