ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - घरात शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास जाणा-या ग्रामीण भागातील महिलांना बलात्काराचा धोका असतो असे मत केंद्र सरकारने मांडले आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी केंद्र सरकारने सर्व राज्यातील मंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रकामध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे
देशातील स्वच्छतेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी केंद्र सरकारने एका परिषदेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात सर्व राज्याच्या मंत्र्यांना केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने एक पत्रक पाठवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील घरांमध्ये शौचालय नसल्याने महिलांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचासाठी जावे लागते. यासाठी महिलांना रात्री अंधार पडायची वाट बघावी लागते. या महिलांवर बलात्कार होण्याचा धोका असतो असे विश्लेषण यात करण्यात आले आहे. गर्भवती आणि मासिकपाळी सुरु असलेल्या महिलांना उघड्यावर शौचासाठी जाणे हे आणखी त्रासदायक असते. शौचालय हे प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी गरजेचे असून स्वच्छ शौचालयांचा महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचेया पत्रकात म्हटले आहे.