नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराची निर्मिती, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे हे मुद्दे भाजपच्या अजेंड्यावर कायम असून त्याबाबत व्यापक सल्लामसलतीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे कायदामंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तूर्तास चांगले प्रशासन आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. संपुआच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत त्याकडे दुर्लक्ष केले होते. मी राज्यसभेत याबाबत आधीच निवेदन दिले आहे. त्यामुळे भाजपच्या अजेंड्यावर हा मुद्दा असून आम्ही जाहीरनाम्यातही कलम ३७० मध्ये सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. मी एक पाऊल पुढे जात तेच सांगत आहे. विविध पक्षांशी सल्लामसलत केली जाईल. विशेष दर्जाचा काही भागाला लाभ होत आहे, त्या भागालाही चर्चेत सहभागी करण्याची काळजी घेतली जाईल, असे ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. संबंधितांची यादी बरीच मोठी असून त्यांच्याशी सल्लामसलत व्हायला हवी. त्यानंतरच समोर जाता येईल. सर्व पक्षांमध्ये सहमती घडवून आणल्याखेरीज घिसाडघाईने निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आम्ही सावकाश वाटचाल करू. हा मुद्दा आम्ही सोडलेला नाही, हाच त्याचा अर्थ होतो, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राममंदिर, कलम ३७० अजेंड्यावरच
By admin | Updated: June 17, 2015 02:45 IST