ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि.९ - सत्यमचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांना आर्थिक गुन्हे विषयक न्यायालयाने सोमवारी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने राजू यांना पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पाच वर्षांपूर्वी सत्यम या ख्यातनाम आयटी कंपनीत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी रामलिंग राजू, त्यांचे बंधू राम राजू व अन्य आठ जणांविरोधात आर्थिक गुन्हे न्यायालयात खटला सुरु होता. फसवणूक, कट रचणे, बोगस कागदपत्र तयार करणे, आयटी नियमांचे उल्लंघन करणे या कलमांखाली हा खटला दाखल झाला होता. सोमवारी कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला असून कोर्टाने रामलिंगम राजू आणि त्यांचे बंधू रामा राजू यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सत्यममधील अन्य एका घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनेही राजू यांच्याविरोधात तपास केला असून या खटल्याचा निकाल २३ डिसेंबर रोजी येणार आहे.