जयपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे राजस्थानच्या सरदार शहरचे काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांना रविवारी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांनी अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी गुरुदास कामत यांच्या निर्देशावरून आ. भंवरलाल शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे, असे प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. अर्चना शर्मा यांनी सांगितले. राजस्थानच्या २०० सदस्यीय विधानसभेतील काँग्रेसच्या २१ आमदारांमध्ये शर्मा हे एक आहेत. राहुल गांधी हे राजकारणाची उचित समज नसणार्या लोकांनी वेढलेले आहेत, असा आरोप करून शर्मा यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. ‘राहुल गांधी हे पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या लायक नाहीत. राहुल गांधी हे विदुषकांच्या कंपनीचे एमडी आहेत आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षात लोकशाही पद्धतीने बदल केला पाहिजे आणि पुत्रमोह सोडला पाहिजे,’ असे शर्मा म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
राहुल गांधींवरील टीका भोवली
By admin | Updated: June 2, 2014 06:06 IST