ऑनलाइन लोकमतबिजनौर(उत्तर प्रदेश), दि. २२ - १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांनी जाग आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिजनौर जिल्ह्यातील चांडक या गावात राहणा-या १४ वर्षाच्या मुलीवर गावातील तरुणाने बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. बुधवारी नराधम तरुणाने पुन्हा एकदा पिडीत मुलीला गाठले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार असह्य झाल्याने पिडीत मुलीने कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पिडीत मुलगी व तिचे आईवडिल तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात गेले. हा प्रकार गावातील पंचायतीच्या सदस्यांना समजला. त्यांनीही पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करु नये यासाठी दबाव टाकला. पोलिसांनीही पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पंचयातीमध्ये सामोपचाराने तोडगा काढा असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. गुरुवारी गावातील पंचायतीने नराधम तरुणाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल न करता पिडीत मुलीने त्याला पाच वेळा श्रीमुखात मारावे अशी शिक्षा द्यायला सांगितले. पोलिसांकडे तक्रार केल्यास मुलीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकू अशी धमकीच पंचायतीने दिल्याने मुलीने नराधमाला पाच वेळा मारुन प्रकरण मिटवले. पिडीत मुलगी ही गरिब शेतक-याच्या कुटुंबातील मुलगी असून नराधम तरुण हा गावातील श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.
बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके
By admin | Updated: August 22, 2014 18:39 IST