बंद बंगल्यात चोरी : संशयित आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडीमहाबळेश्वर : महाबळेश्वर शहराच्या जवळच असलेल्या मोळेश्वर गावातील बंद बंगल्यातून चोरलेले सामान डंपरमधून नेत असताना शहर पोलिसांनी पुण्याच्या नऊ तरुणांना मुद्देमालासह पकडून अटक केली.मोळेश्वर भागात अनेक धनिकांचे बंगले असून, सुटी दरम्यान त्याचा वापर करण्यात येतो. अशाच एका बंगल्यामध्ये नऊ जणांनी अनधिकृत प्रवेश करून बंद बंगल्याचे लोखंडी पोल, ग्रील व इतर लोखंडी सामान चोरून नेत असताना मोळेश्वर सरपंच सुनील शंकर जंगम यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. तातडीने पोलिसांनी गस्त सुरू करून डंम्पर (एमएच १२ एचडी ७६०५) संशयित सामान भरून नेत असताना पकडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश चंद्रकांत निवगुणे (वय २३, रा. आंबी, ता. हवेली, जि. पुणे), सुमन मोलकोड्या बिमोरू (२५, कस्तुरबा गणेश खिंड, पुणे), अमित सतपाल भिगाणीया (२३, रा. देहूरोड, पुणे), श्रीनिवास व्यंकटेश वाडकोप (३२, शिवाजीनगर, पुणे), उमेश अशोक मानकर (२३, शिवाजीनगर, पुणे), करण राजू बोत (२६, खडकी), सोमबहादूर गुरंक (३७, खडकी), भूपेंद्र विक्रम कपूर (१८, खडकी), विकी रामदास कदम (खडकी पुणे) यांना चोरलेल्या मुद्देमालासह अटक केली. चोरीसाठी वापरलेले एक बाटला व गॅसकटर त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. गुन्ह्यासाठी वापरलेला डंपर व हस्तगत केलेला चोरीचा माल सुमारे पन्नास हजारांचा असून, ४ लाख ५५ हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.आरोपींना वाई न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक काशीद अधिक तपास करत आहेत. (वार्ताहर)
पुण्याच्या तरुणांना चोरीप्रकरणी अटक
By admin | Updated: January 19, 2015 00:34 IST