पुण्यात मद्यपी विद्यार्थ्यांचा धिंगाणा
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
ग्रामस्थांची तक्रार : ५१ तरुण, ११ तरुणी ताब्यात
पुण्यात मद्यपी विद्यार्थ्यांचा धिंगाणा
ग्रामस्थांची तक्रार : ५१ तरुण, ११ तरुणी ताब्यातपिंपरी : नेरे-दत्तवाडी (मुळशी) रस्त्यावरील फार्महाऊसमध्ये डीजेच्या तालावर धिंगाणा घालणार्या ६२ विद्यार्थ्यांना हिंजवडी पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. यात ५१ तरुण आणि ११ तरुणींचा समावेश आहे. त्या ठिकाणी साडेसहा हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. हमीपत्र लिहून घेतल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.एका उद्योजकाचा मुलगा नीरव अनिल जमतानी (२१) याने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. एका नामांकित महाविद्यालयात शिकणारे हे तरुण-तरुणी विविध प्रांतातील असून, शिक्षणासाठी ते पुण्यात आलेले आहेत. रात्री दीड वाजता त्यांनी फार्महाऊसवर मद्यप्राशन करून धांगडधिंगा सुरू केला. कर्णकर्कश डीजेचा त्रास होऊ लागल्याने तेथील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली. गस्तीवरील पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे आणि सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी फार्महाऊसकडे धाव घेतली. पहाटे साडेतीन वाजता पोलीस पोहोचताच डीजेच्या तालावर नाचणार्या तरुण-तरुणींचा धांगडधिंगा थांबला.पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. फार्महाऊसची पाहणी करून सुमारे साडेसहा हजारांचा मद्यसाठा जप्त केला. एका मिनीबसमधून सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सकाळी औंध सर्वोपचार रुग्णालयात तरुणींची तर, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तरुणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापैकी ३५ तरुण आणि काही तरुणींनी मद्याचे सेवन केल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळले. त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता हमीपत्र लिहून घेऊन त्यांना सोडण्यात आले, असे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश भोसले यांनी सांगितले.-----------पार्टीला दाखल झालेले तरुण-तरुणी सर्व उच्चभ्रू वर्गातील आणि श्रीमंतांची मुले आहेत. सर्व जण १८ ते २१ या वयोगटातील आहेत. नेरेतील फार्महाऊसवर त्यांच्या दहा ते बारा आलिशान मोटारी उभ्या होत्या.