ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यासंदर्भात ब्रिटीश अधिका-यांना लिहीलेली पत्रं उघड करा अशी मागणी करत ती पत्र उघड झाल्यास मोदींनी माझ्या व काँग्रेसविरोधात केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर उत्तर मिळेल असे वक्तव्य माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. काँग्रेस व पी. चिदंबरम यांनी राजकीय आकसातून आपल्याला लक्ष्य केल्याचा आरोप ललित मोदी यांनी केला होता. त्यानंतर चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत ललित मोदींना चोख प्रत्युत्तर दिले. मोदींचे आरोप अतिशय हास्यास्पद असून ब्रिटिश अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतूनच त्यांच्या आरोपांना उत्तर मिळेल, असे म्हटले.
ललित मोदी हे ब्रिटनमध्ये पुरेशा कागदपत्रां अभावी रहात आहेत, असे त्यांनी सांगितले. ' मोदी यांनी जेव्हा भारत सोडला तेव्हा त्यांच्याकडे पासपोर्ट होता, मात्र नंतर तो रद्द करण्यात आला. मग आता ते तेथे कसे राहू शकतात?' असा सवाल चिदंबरम यांनी केला. 'ईडीचे अधिकारी (अमलबजावणी संचलनालय) मोदींविरोधातील १६ केसेसचा तपास करत होते, त्यापैकी १५ केसेससंदर्भात मोदी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र मोदी त्यांना अनेक काळापासून टाळत होते व त्यांनी ईडीच्या नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही', असेही चिदंबरम यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी सुषमा स्वराज यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वराज यांनी (भारतीय नागरिक असलेल्या) मोदींना कागदपत्रांसाठी ब्रिटीश अधिका-यांऐवजी भारतीय अधिका-यांशी संपर्क साधण्यास का सांगितले नाही असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला.