ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - नियोजन आयोग बरखास्त करुन त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असून यासाठी मोदींनी आता जनतेची मतं जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन संस्थेसाठी तुमच्या सूचना द्या असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियोजन आयोग बरखास्त करुन त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. या नवीन संस्थेच्या निर्मितीमध्ये आता मोदींनी थेट जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. २१ व्या शतकात देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारला एकत्र आणून एक नवीन आयोग स्थापन करण्याची गरज मोदींनी व्यक्त केली आहे. सरकारपातळीवर या संस्थेच्या स्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. यात मोदींनी आता जनतेचा सल्ला घेण्याचा निर्णय घेत नवीन प्रथेला सुरुवात केली आहे. mygov.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना त्यांच्या सूचना किंवा तक्रार मांडता येणार आहे. मोदींच्या या आवाहनावर आता किती प्रतिसाद येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.