ऑनलाइन टीम
श्रीहरिकोटा, दि. ३० - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) पीएसएलव्ही सी -२३ या प्रक्षेपण यानाने यशस्वीरित्या अंतराळाकडे झेप घेतली. या प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून चार देशांचे पाच उपग्रह अंतराळात सोडण्यात आले असून या उड्डाणाच्या माध्यमातून भारताला परकीय चलन मिळणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीही श्रीहरिकोटामध्ये उपस्थित होते.
इस्त्रोच्या व्यावसायिक शाखा एंट्रीक्सने फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर या देशांशी २००७ मध्ये व्यावसायिक करार केला होता. यानुसार फ्रान्स, जर्मनी आणि सिंगापूरचे प्रत्येकी एक तर कॅनडाचे दोन उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार होते. सोमवारी सकाळी या पाच उपग्रहांना घेऊन इस्त्रोचे पीएसएलव्ही सी २३ हे प्रक्षेपक अंतराळाच्या दिशेने झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे यान अवकाशात सोडण्यात आले. भारतीय अंतराळ क्षेत्रात ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते. या मोहीमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित होते.पंतप्रधानांच्या उपस्थितीने इस्त्रोमधील संशोधकांमध्येही उत्साह दिसून आला.
पीएसएलव्ही सी -२३ च्या यशस्वी उड्डाणामुळे इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मोहीमेमुळे इस्त्रो अवजड उपग्रह अंतराळात पाठवू शकते असा संदेश जागतिक स्तरावर गेला असून यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
अवकाशात सोडले पाच उपग्रह
> फ्रान्सचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह स्पॉट ७ (वजन ७१४ किलो)
> जर्मनीचा आयसॅट (वजन १४ किलो)
> सिंगापूरचा व्हेलॉक्स ( वजन ७ किलो)
> कॅनडाचे एनएलएस ७.१ आणि एनएलएस ७.२ (वजन प्रत्येकी १५ किलो)
इस्त्रोने आता सार्क देशांसाठी उपग्रह प्रक्षेपित करावा - मोदी
इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी २३ च्या उड्डाणाचा क्षण अनुभवण्यासाठी सतीश धवन अंतराळ केंद्रात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात इंग्रजी भाषेत केली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमुळेच भारताने उपनिषद ते उपग्रह असा पल्ला गाठला. पीएसएलव्ही सी२३ च्या यशस्वी उड्डाणासाठी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार. चार विकसित देशांचे उपग्रह भारत अवकाशात सोडतो. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणे हे मी माझे भाग्यच समजतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. हॉलीवूडमधील ग्रॅव्हिटी चित्रपटापेक्षा कमी खर्चात भारताचे उपग्रह प्रक्षेपित होतात. हे शास्त्रज्ञांच्या कष्टामुळेच शक्य झाल्याचे सांगत देशात इंडरॅक्टिव्ह डिजिटल स्पेस म्युझियम उभारायला पाहिजे असेही मतही त्यांनी मांडले.
सार्क देशांमधील गरिबी व शिक्षणाचा अभाव यावर मात करण्याची गरज आहे. शेजारी राष्ट्रांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी भारताने मदत करणे गरजेचे आहे. यासाठी सार्क उपग्रह अंतराळात सोडण्याची मोहीम इस्त्रोने हाती घ्यावी असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले. अंतराळ मोहिमेतून सर्वसामान्यांना लाभ होणार नाही असा भारतीयांमध्ये समज आहे. पण हा चुकीचा असून अंतराळ मोहिमेचा सर्वसामान्यांनाही फायदाच होतो असे मोदींनी नमूद केले.