नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळाप्रकरणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा या घोटाळ्यातील सहभाग सिद्ध करणारे ठोस पुरावे त्यांना सादर केले. या घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी आणि चौहान यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची मागणीही काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांकडे केली. शिष्टमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ आणि विवेक तन्खा यांचा समावेश होता. सिंग यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाद्वारे स्थापित विशेष तपास पथकाकडे चौहान यांच्याविरोधात पुरावे सोपविले असून, यात मुख्यमंत्र्यांची घोटाळ्यातील भूमिका स्पष्ट होते, असा दावा पंतप्रधानांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कमलनाथ यांनी उपरोक्त माहिती दिली. हार्ड डिस्कमधून कशा पद्धतीने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांची नावे हटविण्यात आली याचाही सविस्तर खुलासा त्यांनी केला. ही हार्डडिस्क प्रयोगशाळेत प्रमाणित करण्यात आली आहे. ‘स्वत: खाणार नाही आणि खाऊ देणार नाही,’ हे मोदी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तेव्हा या प्रकरणात ते काय करतात हे आता बघू. त्यांना संपूर्ण पुराव्यासह घोटाळ्याचे दस्तावेज दिले असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध दिले पुरावे
By admin | Updated: March 20, 2015 01:18 IST