नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना लागू न केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट केंद्र सरकारवर लक्ष्य साधताना या योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी काँग्रेसतर्फे सरकारवर दबाव आणण्यात येईल, अशी घोषणा शनिवारी केली. काँग्रेस पक्षाच्या माजी सैनिक शाखेच्या एका प्रतिनिधीमंडळाने पक्ष मुख्यालयात राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या योजनेसाठी तरतूद केली होती. एवढेच नाही तर निधीचेही वाटप केले होते. परंतु केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकार ही योजना लागू करण्यास अपयशी ठरले. सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असतानाही या मुद्यावर पुढे काहीच झाले नाही, याकडे गांधी यांनी लक्ष वेधले. माजी सैनिक आपली मागणी घेऊन सरकारकडे गेले होते; परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी सरकारवर सैनिकविरोधी असण्याचा ठपका यावेळी ठेवला. (वृत्तसंस्था)
सरकारवर आणणार दबाव
By admin | Updated: May 23, 2015 23:55 IST