नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लैंगिक समानतेचे आवाहन केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त प्रणव मुखर्जी यांनी ट्विट केले आहे की, भारत आणि जगात सर्वत्र राहणाऱ्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! भारतीय महिलांच्या विविध पिढ्यांनी देशाच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात स्त्री शक्तीचे दुर्दम्य साहस, निर्धार आणि समर्पण याचे कौतुक केले आहे. मोदी म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक समानतेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे की, आजच्या दिवशी मी भारतातील नागरिकांना आवाहन करतो की, लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपली बांधिलकी दाखवून द्यावी. आपल्या वेबसाईटवर मोदी यांनी पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे की, महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार काम करत आहे. अशा स्मार्ट फोनबाबत विचार सुरू आहे ज्यात जीपीएस सुविधा असतील आणि तो फोन महिलांना मदत करू शकेल. सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत महिलांना मिळणारे लाभ आणि नगदी ६ हजार रुपयांची मदत याचाही त्यांनी उल्लेख केला. - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान गतीने पुढे जात आहे. आता ही शिक्षणाची चळवळ झाली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत डिपॉझिटमुक्त १.७५ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत. पाच कोटी कनेक्शन देण्याचे यात लक्ष्य आहे. मोदी यांनी म्हटले आहे की, महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय मानवतेची प्रगती अपूर्ण आहे. आता मुद्दा महिलांच्या विकासाचा नाही, तर महिलांच्या नेतृत्वातील विकासाचा आहे.महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा त्यांनी या वेळी उल्लेख केला. लोकांना त्यांनी आवाहन केले की, अशा योजना सण-उत्सवाच्या वेळी महिलांना भेट म्हणून द्याव्यात.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासीयांना लैंगिक समानतेचे आवाहन
By admin | Updated: March 9, 2017 00:43 IST