ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - 'आयएसआयएस' (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या दहशतवादी संघटनेसाठी काम करणा-या कल्याणमधील चार युवकांपैकी एका तरूण, आरिफ माजिद याचा इराकमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. कल्याणमध्ये राहणारे चार तरूण अमन तांडेल, फहाद शेख, आरिफ माजिद व शाहीन तन्की गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करणा-या आरिफचाही समावेश होता.ते चौघेही 'आयएसआयएस'साठी काम करत असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, काही दिवसांनतर आरिफ व तन्की या दोघांनी कुटुंबियांशी संपर्क साधून आपण सीरियातील रक्का प्रांतात या संघनेसाठी काम असल्याची कबुली दिली होती. त्यापैकी आरिफचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
आरिफच्या मृत्यूची बातमी तन्कीकडून समजल्यचे फहाद शेखचे काका इफ्तिकार खान यांनी सांगितले. ' तन्कीने मंगळवारी कुटुंबियांना फोन करून आरिफचा इराकमध्ये मृत्यू झाल्याची बातमी दिली. आपण आरिफच्या ख्यालीखुशीलीची चौकशी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे समजले' असे तन्कीने फोनवरून सांगितले. मात्र याप्रकरणी आपल्याला जास्त माहिती मिळ शकली नसल्याचेही तो म्हणाला. आरिफच्या मृत्यूबाबात गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही', असेही इफ्तिकार खान यांनी सांगितले
कल्याणमध्ये हे चारही तरूण आपापल्या कुटुंबियांसोबत रहात होते. दहशतवादविरोदी पथकाच्या अधिका-यांनी १४ जुलै रोजी त्यांच्या घरून लॅपटॉप्स आणि पेनड्राईव्ह जप्त केले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी आरिफचे वडील, एजाज माजीद यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली होती. आपल्या मुलाला 'जिहाद'चा मार्ग स्वीकारायला लावणा-यांविरोधी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजीद यांनी केली होती.
धार्मिक यात्रेसाठी ३० जणांच्या ग्रुपबरोबर इराकमध्ये गेलेले हे चौघेजण भारतात परत येण्याच्या एक दिवस आधी गायब झाले होते. चौघांना 'मौसुल' येथे सोडल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने शोधपथकातील अधिका-यांना दिली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. यात्रेला जाण्यापूर्वी आरिफ कुटुंबियांसाठी घरात एक पत्रही ठेवून गेला होता. त्यात त्याने धूम्रपान, टीव्ही पाहणे, अनैतिक शरीरसंबंध, चैनीने जीवन जगणे, प्रार्थना न करणे या सर्व कृत्यांचा पाप असा उल्लेख करत त्याबद्दल चीड व्यक्त केली होती. तसेच या सर्व पापांमुळे नरकातील आग वाट्याला येईल असा इशाराही त्याने कुटुंबियांना दिला होता.