नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला नियोजन आयोग गुंडाळून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या पहिल्या भाषणात लाल किल्ल्यावरून केली. विरोधी पक्षांना सोबत येण्याचे आवाहन करून देशातील जातीय आणि धार्मिक हिंसाचार रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशवासीयांना उद्देशून केलेल्या आपल्या ६५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी अहिंसा, स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता, उद्योग अशा विविध विषयांवर भाष्य केले. उत्पादन क्षेत्रावर भर देऊन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत आयात कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगितले. राज्य सरकारांना सोबत घेऊन देशाला प्रगतिपथावर आणण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मी देशाचा पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधानसेवक म्हणून तुमच्याशी बोलायला आलोय, असे सांगत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. भारताला शेतकरी, कामगार वर्गाने घडवले आहे. भारताच्या वाटचालीत सर्व माजी पंतप्रधानांचे मोलाचे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना मी वंदन करतो, असेही मोदी म्हणाले. सरकार सर्व पक्षांना घेऊन पुढे चालत असून, विरोधी पक्षांनी दिलेल्या सहमतीसाठी मोदींनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी राज्यांनाही सोबत घेऊ. त्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवस्थेत थोडा बदल करावा लागेल. नियोजन आयोग बरखास्त करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करू. यात राज्य सरकारलाही स्थान दिले जाईल, अशी शाश्वतीही त्यांनी दिली. ही नवीन संस्था सरकारी-खासगी भागीदारी आणि तरुणांतील ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करण्यावर भर देण्यासह नवीन संकल्पना मांडण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.
नियोजन आयोग गुंडाळणार!
By admin | Updated: August 16, 2014 03:07 IST