नवी दिल्ली : मुंबईतील एका २२ वर्षीय गर्भवती महिलेला २४ आठवड्यांच्या गर्भपातास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या गर्भात अनेक विकृती असून, त्याला मूत्रपिंडच नसल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या सुरक्षेसाठी हा निर्णय दिला आहे. या गर्भामुळे या महिलेचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे मत न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वरा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. या महिलेच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी न्यायालयाने मेडिकल बोर्डाची स्थापना केली होती. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधील मेडिकल बोर्डाच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयाने ५ जानेवारी रोजी याबाबत निर्णय घेण्यासाठी मेडिकल बोर्डाची स्थापना केली होती. या महिलेने केलेल्या अर्जात म्हटले होते की, या गर्भाला (मूत्रपिंड) किडनी नाही आणि त्यात अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला गर्भपाताची परवानगी देण्यात यावी. वास्तविक कायद्यानुसार २० आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांच्या गर्भपातास परवानगी दिली जात नाही, पण या प्रकरणात परवानगी देण्यात आली.या महिलेने न्यायालयात सांगितले होते की, २१ आठवड्यांनंतर आपल्याला समजले की, गर्भाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. या मेडिकल बोर्डात प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग, मेडिसिन, रेडिओलॉजी आणि भूलतज्ज्ञ यांचा समावेश होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२४ आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी
By admin | Updated: February 8, 2017 01:26 IST