नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती मान्यता नसलेल्या क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी केली आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग वादामध्ये याचिकाकर्ते असलेले वर्मा यांनी श्रीनिवासन गटाला न्यायालयात खेचले. त्यामुळे आयसीसीचे चेअरमन असलेल्या श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यापासून रोखले. वर्मा म्हणाले,‘मी पवार यांना निवडणूक लढविण्याची विनंती केली. बीसीसीआय बुडणारे जहाज असून केवळ पवार हेच त्याला पुनर्जीवन देऊ शकतात. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून अधिकारी म्हणून ते विश्वासपात्र आहेत.’बीसीसीआयचे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी मर्जीतील युनिट्सची गुरुवारी ( दि.५) चेन्नई येथे अनौपचारिक बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते भविष्यातील वाटचालीचे डावपेच आखतील, अशी शक्यता आहे.अत्यंत विश्वासू संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक असल्याने या बैठकीला ‘कोअर कमिटी’ बैठक असेही संबोधले जात आहे. याच दिवशी आमसभेची तारीख आणि भविष्यातील डावपेच निश्चित केले जातील. श्रीनिवासन यांची बीसीसीआयमधील पुढील भूमिका देखील याच दिवशी समजून येईल, असे चेन्नईला जाणाऱ्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.या बैठकीला सचिव संजय पटेल आणि अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव हे उपस्थित राहणार असले तरी संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांना उपस्थित राहण्यास कळविण्यात आलेले नाही. दिल्ली विधानसभेची ७ तारखेला निवडणूक असल्याने ठाकूर हे राजधानीत तळ ठोकून आहेत. पण श्रीनिवासन यांनी आपल्याला प्रस्तावित बैठकीची माहिती दिली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अन्य पदाधिकाऱ्यांकडून त्यांना ही माहिती मिळाली. संयुक्त सचिव या नात्याने कार्यकारी मंडळात ठाकूर महत्त्वपूर्ण व्यक्ते आहेत. तरीही त्यांना डावलण्यात आले. स्पॉट फिक्सिंग वाद चव्हाट्याव आला आणि त्यात जावई गुरुनाथ मयप्पन याला अटक झाल्यानंतर ठाकूर यांनी श्रीनिवासन यांना पदावरून पायऊतार होण्याची सूचना केली होती. स्पष्टवक्ते असलेले ठाकूर यापुढे श्रीनिवासन यांच्या गटात राहू शकणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. बीसीसीयच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आसाम संघटनेचे सचिव बिकास बरुआ यांना श्रींनी आमंत्रित केले आहे. (वृत्तसंस्था)शुक्ला अध्यक्षपदाचे दावेदारराजीव शुक्लादेखील पुढील अध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात, पण त्यासाठी पूर्व विभागाकडून त्यांना पाठिंबा हवा आहे. पण सोमवार सायंकाळपर्यंत क्रिकेट असोसिएशन आॅफ बंगालला चेन्नईच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले नव्हते.अनुराग ठाकूर बाहेर पडणारअनुराग ठाकूर हे सध्याच्या कार्यकारिणीत बलाढ्य मानले जातात. श्रीनिवासन यांच्या कृतीमुळे डावलण्यात आलेले संयुक्त सचिव ठाकूर लवकरच श्रीनिवासन गटातून बाहेर पडतील, ही चर्चा ऐकायला मिळाली.
पवार यांनी बीसीसीआयची निवडणूक लढवावी
By admin | Updated: February 3, 2015 01:18 IST