करमाळा : तालुका कृषी सहायक पदावर कार्यरत असलेले कंदर (ता.करमाळा) येथील दत्तात्रय मोहन पवार यांना पुनर्वसन शाखेने प्रकल्पग्रस्त असल्याबाबत दाखला दिलेला नाही असे लेखी पत्र सोलापूर पुनर्वसन शाखेचे उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग पुणे यांना दिलेले आहे.करमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सध्या कार्यरत असलेले दत्तात्रय मोहन पवार यांनी प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला सादर करून कृषी सहायक पदावर नोकरी मिळवली.शिवाय प्रकल्पग्रस्त दाखला वैध असल्याबाबत पुनर्वसन अधिकारी सोलापूर यांच्या स्वाक्षरीने बनावट पत्र तयार करून या कार्यालयाची फसवणूक केल्याची तक्रार सोलापूर येथील संभाजी आरमार या संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.पुनर्वसन विभागाचे तत्कालिन उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी चौकशी केली असता दत्तात्रय पवार यांनी नोकरीसाठी प्रकल्पग्रस्ताचा बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक,सोलापूर यांना कळविला होता. त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक रफिक नाईकवाडी यांनी दत्तात्रय पवार यांना तत्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस विभागीय सहसंचालक पुणे विभाग, पुणे यांना केली होती. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांनी जिल्हा पुनर्वसन शाखा सोलापूर यांच्याकडे कृषी सहायक दत्तात्रय मोहन पवार यांच्या प्रकल्पग्रस्त दाखल्याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी दत्तात्रय पवार यांना या कार्यालयाने प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला दिलेलाच नाही असे लेखी पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)
पवार यांना दाखला दिलेला नाही , पुनर्वसन शाखेची माहिती
By admin | Updated: May 11, 2014 00:51 IST