हरीश गुप्ता, नवी दिल्लीगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आलेले दिल्लीचे बोलावणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेली चर्चा यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग निश्चित मानला जात आहे़ पर्रीकर यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद सोपविण्यात येईल, अशी शक्यता आहे़ त्यांच्यासोबतच रविवारी अपेक्षित असलेल्या विस्तारात आणखी डझनभर चेहरे मंत्रिपदाची शपथ घेण्याचीही शक्यता आहे़अरुण जेटली अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या जबाबदारीत व्यग्र असल्याने त्यांच्याकडील संरक्षण मंत्रिपद पर्रीकर यांच्याकडे सोपविले जाऊ शकते, याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’नेच सविस्तर वृत्त दिले होते़ म्यानमार, आॅस्ट्रेलिया आणि फिजी या देशांच्या १० दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान आपल्या पाच महिने जुन्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू इच्छितात़ महाराष्ट्रातून हंसराज अहीर व पूनम महाजन यांची नावे चर्चेत असून, झारखंडमधून जयंत सिन्हा यांचे नाव आघाडीवर आहे़ भाजपा सरचिटणीस राजीव प्रताप रुडी आणि मुख्तार अब्बास नकवी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते़ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियोजित विस्तारात स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळू शकते़
पर्रीकर यांचे संरक्षण खाते निश्चित
By admin | Updated: November 6, 2014 05:32 IST