नवी दिल्ली : कर कटेवर ठेवून सावळ्या पांडुरंगाचे आगमन राजपथावर होताच टाळ्यांचा कडकडाट तर झालाच होता, पण खुर्च्यांवर बसलेले महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेशातील केंद्रीय मंत्री व खुद्द लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेतले होते.. ‘पंढरीची वारी’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशातील सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान जाहीर झाला; आणि राजधानीतील प्रजासत्ताक दिनाची महन्मंगल सकाळ ज्यांनी ज्यांनी तो सोहळा अनुभवला त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली....प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात ‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्तम असून, देशातील २५ चित्ररथांमधून त्याची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आल्याचे संरक्षण विभागाच्या परीक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केले. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने सादर केलेल्या लेजीम नृत्याला प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर झाले आहे. या पुरस्कारासह राज्याने आजवरच्या कारकिर्दीत सहाव्यांदा प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या ९ आणि विविध राज्यांतील १६ चित्ररथांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
पंढरीची वारी ठरली ‘लय भारी’
By admin | Updated: January 30, 2015 04:42 IST