भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्युत्तरात भारताने त्यांचे सर्व हल्ले हाणून पाडले. या कारवाईनंतर केंद्र सरकारने आज शुक्रवारी औपचारिक पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
नुकतीच देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल नवीन माहिती दिली. तसेच कर्नल कुरेशी यांनी हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानने नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करण्याचा लज्जास्पद प्रयत्न कसा केला? हे सांगितले.
विक्रम मिस्री म्हणाले की, 'पाकिस्तानने कंधार, उरी, पूंछ, राजौरी, अखनूर आणि उधमपूर यासारख्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात गोळीबार करून भारताविरुद्ध चिथावणीखोर लष्करी कारवाई केली. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलांना काही नुकसान आणि दुखापत झाली. या कृत्याबद्दल पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न असूनही पाकिस्तानने आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही, जे एक धोकादायक आणि बेजबाबदार पाऊल आहे. पाकिस्तान नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर करत आहेत. यामुळे पाकिस्तानच नाही तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे', असे ते म्हणाले.
पाकिस्तानने गुरुवारी संध्याकाळी जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील प्रदेशांना लक्ष्य करून पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. परंतु, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानने हल्ला केल्याचे समजताच अनेक शहरांमध्ये सायरन वाजले आणि हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सुरू असलेला आयपीएल सामना स्थगित करण्यात आला.