जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची व्याप्ती सांबा जिल्ह्यापर्यंत वाढवत जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या २४ गावांसह ४० सीमा चौक्यांवर प्रचंड गोळीबार केला. यामध्ये तिघे जखमी झाले. भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर दिल्याने धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंकडून सकाळी ७ वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. पाकिस्तानी सैन्याने जम्मू जिल्ह्यातील अरनिया आणि आर.एस. पुरा सबसेक्टरमध्ये रविवारी रात्री ९.३० वाजेपासून रहिवासी भागात आणि ३५ ते ४० चौक्यांवर स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला तसेच उखळी तोफांद्वारे मारा केला. सांबा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यांकडून पहिल्यांदाच शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत सीमा भागातील २४ गावांना लक्ष्य करण्यात आले. यात तीनजण जखमी झाले. जखमींत फ्लोरा गावातील दोन आणि खोथर गावातील एका व्यक्तीचा समावेश आहे, असे आर.एस. पुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवेंद्रसिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
पाकचा गोळीबार सुरूच
By admin | Updated: August 25, 2014 23:31 IST