जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने लष्कराला पाकिस्तानवर लष्करी कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एवढे भीषण दहशतवादी हल्ले होऊनही साधे अवाक्षर न काढणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना आता पाकिस्तानचा कळवळा आला आहे. भारतीय सैन्य कारवाई करणार हे समजताच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला होता.
गुटेरस यांनी जयशंकर यांना फोन केल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही फोन केला. गुटेरस यांनी आठवड्याभराने फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच युद्ध नाही तर कायदेशीर मार्गाने या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याचा सल्ला दिला आहे.
गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ही माहिती दिली आहे. महासचिवांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र फोनवर चर्चा केली. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरचिटणीसांनी तीव्र निषेध केला, असे ते म्हणाले.
कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची परिस्थिती टाळणे महत्वाचे आहे. गंभीर परिणाम होऊ शकतात, तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही प्रयत्नात मदत करण्याची तयारी असल्याचे गुटेरस यांनी दोन्ही देशांना सांगितले.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांच्याशी फोनवर चर्चा झाली. बाबदारी सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर एकमत झाले. या हल्ल्यातील कट रचणाऱ्यांना, समर्थकांना आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.