पान २ : अगधीच कमी विद्यार्थी असलेल्या शाळेला कुलूप
By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST
- यंदा विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही
पान २ : अगधीच कमी विद्यार्थी असलेल्या शाळेला कुलूप
- यंदा विलिनीकरणाचा प्रस्ताव नाहीपणजी : कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांचे विलिनीकरण करण्याचा यंदा शिक्षण खात्याचा प्रस्ताव नसला तरी अगधीच कमी विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळा मात्र बंद करून विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेल्या प्राथमिक शाळांचे विलिनीकरण करण्याचा यंदा शिक्षण खात्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे १५ हून कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत; परंतु ज्या शाळेत एक ते पाच वगैरे विद्यार्थी आहेत त्या शाळा मात्र बंद कराव्याच लागणार आहेत. शिक्षण खात्यातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. राज्यात एकही एक शिक्षकी शाळा न ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ज्या शाळेत १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत ती शाळा एक शिक्षकी शाळा ठरविली जाते. अशा शाळेत एकच शिक्षक सर्व वर्ग शिकवितात. अशा शाळा बंद करून ती जवळच्या शाळेत विलीन करण्याचा प्रस्ताव शिक्षण खात्याने केला होता व त्याला मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली होती. कमी संख्या पटाच्या दोन शाळा एकत्र करून एक अधिक विद्यार्थ्यांची शाळा करण्याचीही त्यात तरतूद होती; परंतु या वर्षी प्राथमिक शाळेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नसल्याची माहिती शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी दिली. राज्यात ८५० सरकारी प्राथमिक शाळा आहेत. त्यात सर्वाधिक शाळा या मराठी माध्यमातून आहेत. २०१३-१४ मध्येही काही शाळांचे विलिनीकरण करण्यात आले होते. जवळची शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जावे लागते यासाठी पालकांनी या निर्णयाला विरोध केला होता. पालक-शिक्षक संघटनांनी तसे ठराव घेऊन शिक्षण खात्याला पाठविले होते; परंतु ज्या ठिकाणी जवळपास दुसरी शाळा नाही अशा ठिकाणच्या शाळा बंद न करण्याचा निर्णय खात्याने घेतला होता. किंवा दूरच्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले होते.