विदर्भ-बारदान्याअभावी धान खरेदी रखडली
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
बारदान्याअभावी धान खरेदी रखडली
विदर्भ-बारदान्याअभावी धान खरेदी रखडली
बारदान्याअभावी धान खरेदी रखडलीशेतकरी अडचणीत : ४४ केंद्रांवर धान खरेदीगडचिरोली : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या बहुतांश धान खरेदी केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने धान खरेदी ठप्प पडली आहे. अशातच जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५४ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ४४ केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या धानाचे मोजमाप केल्यानंतर सदर धान आदिवासी विकास महामंडळाच्या बारदान्यामध्ये भरले जाते. त्यानंतर तेच पोते आदिवासी विकास महामंडळ उचल करते. या धान खरेदी केंद्रांना पोते पुरविणे ही आदिवासी विकास महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र निम्म्या धान खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध नाही. त्यामुळे आठवड्यापासून धान खरेदी ठप्प पडली आहे. बँंकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी धान विकण्यास काढत आहेत. मात्र धानाचे मोजमाप होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. याबाबत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या व्यवस्थापकांना शेतकरी विचारणा करीत आहेत. त्यावेळी महामंडळानेच बारदान उपलब्ध करून दिला नसल्याने आपण काहीही करू शकत नाही, असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. ३१ मार्चपूर्वी धानाचे चुकारे उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे तत्काळ बारदाना उपलब्ध करून देऊन चुकारे देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)बॉक्सपावसाने चिंता वाढविलीबुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक वैरागड, कढोली परिसरात पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसामुळे उघड्यावर पडलेले धान भिजून नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.