बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST
सोलापूर :
बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखा, सोलापूर व लोकमंगल समूह, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, दि.२० एप्रिल ते ३ मेदरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विजय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिबिरात इयत्ता ४ थी ते ९ वीतील ९ ते १५ या वयोगटातील मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींच्या व पालकांच्या सोयीसाठी हे शिबीर सरस्वती चौकातील छत्रपती शिवाजी प्रशाला व विजापूर रोडवरील निर्मिती विहारजवळील आदित्यनगर येथील निर्मलाताई ठोकळ प्रशालेत हे शिबीर होणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात अभिनय, कला, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंगमंच या विषयाचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान एक बालनाट्यही बसवून ते दि.३ मे रोजी समारोपाप्रसंगी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सादर करण्यात येणार आहे. शिबिरात सोलापुरातील नामवंत व अनुभवी नाट्यलेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार यांचे मार्गदर्शन होणार आहे. उन्हाळा असल्याने शिबिराची वेळ सकाळी ८ ते ११ अशी ठेवण्यात आली आहे. प्रवेशासाठी दिशा अकॅडमी, निर्मिती विहार, लोखंडवाला रेसिडेन्सी, विजापूर रोड तर शहरातील लोकांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे बुकिंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय साळुंके यांनी केले. यावेळी जयप्रकाश कुलकर्णी, कमलप्रभा हावळे, अनुजा मोडक, अमोल धाबळे, प्रशांत शिंगे, आशुतोष नाटकर, राजासाहेब बागवान, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)