ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेससह दहा विरोधी पक्षांनी आज राजधानी दिल्लीत मोर्चा काढला. संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष सोनिया यांनी केले. यावेळी शरद यादव, सीताराम येचुरू, सुप्रिया सुळे, दिनेश त्रिवेदी यांसह विरोधी पक्षातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
शेतक-यांच्या विरोधात असलेले भूसंपादन विधेयक आपल्याला मान्य नसून ते सिलेक्ट कमिटीकडे परत पाठवण्यात यावे अशी विरोधकांची मागणी असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना असे निवदेन सादर करण्यात येणार आहे. राजधानीतील या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र त्याला न जुमानता विरोधक या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.