तीन भावांपैकी एकाची जन्मठेप कायम
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
हायकोर्ट : दोघांना सहा वर्षे सश्रम कारावास
तीन भावांपैकी एकाची जन्मठेप कायम
हायकोर्ट : दोघांना सहा वर्षे सश्रम कारावासनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील आरोपी तीन सख्ख्या भावांपैकी एकाची जन्मठेप कायम ठेवली, तर दोघांना सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना गोंदिया येथील आहे.पर्वेश मनोहर रामटेके (४०) असे जन्मठेप कायम असलेल्या तर, संदेश (२८) व नीलेश (३०) अशी त्याच्या भावांची नावे आहेत. मृताचे नाव अंकित नंदागवळी होते. २ ऑगस्ट २०१० रोजी सायंकाळी ७ वाजता पर्वेशने अंकितची चाकूने भोसकून हत्या केली. अन्य दोघांनी अंकितला पकडून ठेवले होते. त्यापूर्वी पर्वेशने मनोज कुकरेजाला चाकूने गंभीर जखमी केले होते.२९ सप्टेंबर २०१२ रोजी गोंदिया सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप सुनावली होती. पर्वेशला कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गतही जन्मठेप झाली होती. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता पर्वेशची भादंविच्या कलम ३०२ अंतर्गतची जन्मठेप कायम ठेवून कलम ३०७ अंतर्गतची जन्मठेप रद्द केली. संदेश व नीलेशला कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत सहा वर्षे सश्रम कारावास सुनावला.