ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - भारतात दरवर्षी सुमारे एक लाख मुले बेपत्ता होतात अशी धक्कादायक माहिती गृहमंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये सुमारे १ लाख ७० हजार मुले हरवल्याच्या माहितीवरून संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारत याप्रकरणी सरकार पुरेसे लक्ष देत नसल्याबद्दल बोल सुनावले होते. 'हरवलेल्या मुलांबाबत कोणालाच चिंता नाही, ही खरच दुर्दैवी गोष्ट आहे', असे मतही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. मात्र दीड वर्षानंतरही यात काहीही फरक पडला नसून अद्यापही ४५ टक्के मुलांचा शोध लागू शकलेला नाही.
गृह मंत्रालयाकडून संसदेत गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या अहवालातील माहितीनुसार, २०११ ते २०१४ (जूनपर्यंत) ३ लाखांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. याबाबतीत भारतातील परिस्थिती इतर देशांपेक्षा अतिशय वाईट असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानात दरवर्षी सुमारे ३ हजार मुले हरवतात, तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये हाच आकडा दरवर्षी १० हजार मुले इतका आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनुसार, आपल्या देशात दर ८व्या मिनिटाला एक मूल बेपत्ता होते. चिंताजनक बाब म्हणजे, या हरवलेल्या मुलांमध्ये ५५ टक्के मुलींचा समावेश असून ४५ टक्के मुलांचा आत्तापर्यंत शोधच लागलेला नाही.
मुलं हरवण्यामध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वात वाईट असून गेल्या तीन वर्षांत राज्यातून ५० हजारपेक्षा जास्त मुले बेपत्ता झाली असून त्यात १० हजारांपेक्षा जास्त मुलींचा समावेश आहे. तर मध्य प्रदेश, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये सुमारे २५ हजार मुले बेपत्ता झाली आहेत.