राजू नायक, नवी दिल्लीगोव्यातील पर्रीकर मंत्रिमंडळात माझ्याकडे असलेली आरोग्य आदी खाती न घेता खाण तसेच सर्व समस्याग्रस्त खाती मी घेईन, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे सांगितले. ते म्हणाले, माझ्याकडे पूर्वी जी खाती होती त्याचा पूर्ण अभ्यास मला आहे, त्यामुळे तीच खाती आता पुन्हा न घेता नवीन खाती घेऊन ती अभ्यासायची संधी मिळत असेल तर ती घ्यावी, असा निर्णय मी घेतला आहे. पर्रीकरांएवढा मी बुद्धिमान नाही परंतु अभ्यास करुन आणि ज्येष्ठांचे साहाय्य घेऊन मी या खात्यांना न्याय देणार आहे. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्यांचा एक गट बनवून महत्त्वाचे निर्णय घेताना सल्लासमलत करण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कोणत्याही प्रकारे सरकार संघर्षमय भूमिका घेणार नाही तर मतैक्य आणि सल्लामसलत ही आमची राजकीय तत्त्वे असतील, असे त्यांनी सांगितले. पार्सेकर म्हणाले की, सरकारची ध्येय धोरणे बदलण्याचा प्रश्नच नाही. आम्ही पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीतच राहणार आहोत.
संघर्ष नाही, मतैक्यावर भर - पार्सेकर
By admin | Updated: November 10, 2014 05:26 IST