जामखेड : खर्डा येथे नितीन आगे याच्या हत्येचा निषेध राज्यभरातून होत आहे. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करत आहे. ज्यांनी नितीनला हालहाल करून मारले त्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध आम्ही आवाज उठविला आहे. कोणत्याही समाजाला टार्गेट केलेले नाही. यामुळे दलित-सवर्ण असा समज करून विनाकारण प्रसिध्दीसाठी राजकारण करू नये, असे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात साळवे यांनी म्हटले, प्रेम प्रकरणासारख्या संवेदनशील प्रकरणातून ही हत्या घडली. जे आरोपी आहेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी अशी मागणी आहे. यात विनाकारण कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न नाही. पोलिसांच्या कामाबाबत समाधानी आहोत. त्यांच्या कामात कोणी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाने आमच्यावर चिखलफेक होते असे समजून नये. घडलेली घटना दलित-सवर्ण वाद नसला तरी घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठीच नेते, पुढारी, कार्यकर्ते, आगे कुटुंबाला भेटून त्यांच्या दु:खात सहभागी होत आहेत. हे मराठा समाजाने समजून घ्यावे, असे आवाहन साळवे यांनी केले आहे.
खर्डा प्रकरणी कोणत्याच समाजाला टार्गेट केलेले नाही : साळवे
By admin | Updated: May 9, 2014 00:54 IST